Originally published in Lokmat Times, March 22 2014, page 2.
पुणे : ”महाराष्ट्रात वैविध्यता आहे..पण पुरूष आणि महिला यांना समान वागणूक मिळत नाही. ३७ वर्षापूर्वी मी एका गावातून अभ्यासास सुरूवात केली. तेव्हा लिंगभेद आणि वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, मुलगी नको, हा भेदभाव मोठया प्रमाणात होता. काळाच्या ओघात मुलाचा होणारा हट्ट काही प्रमाणात कमी झाला पण आजही महाराष्ट्रात लिंगभेद कायम आहे. हा भेद थोडाही कमी झालेला नाही,” हा शब्दावत अनुभव आहे कॅनडातून येवून महाराष्ट्रात गेली ३७ वष्रे अभ्यास करणार्या डॉ. कॅरोल वॉलसोफ यांचा.
कुटुंब नियोजन, जननक्षमता या क्षेत्रामध्ये भारतात महिलांची स्थिती काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी १९७0 मध्ये कॅनडातून डॉ. वॉलसोफ या सातार्यातील गोवे गावात आल्या. केवळ भाषेचाच नाही तर देशाचा फरक असतानाही गावातील संस्कृतीशी मिळते-जुळते घेत त्यांनी आपल्या अभ्यासाला सुरूवात केली. १९७0 ते २00७ या ३७ वर्षात त्यांनी दोन टप्प्यात हा अभ्यास केला. १५ ते ४९ वयोगटातील महिलांसह एचआयव्ही बाधीत महिला, विधवा यांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले आणि त्यातून त्यांच्यासमोर हे भयान वास्तव आले.
डॉ. वॉलसोफ म्हणाल्या, सत्तरच्या दशकात महिलांना कोणतेही स्वातंत्र्य नव्हते. केवळ मुल आणि चूल एवढेच काम होते. आपला वंश चालविण्यासाठी मुलगा हवा असा आग्रह धरला जात. त्यासाठी स्त्री जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत बाळांना जन्मच देत राही. यापेक्षा वाईट म्हणजे पुरूष आणि स्त्री यांच्यातील लिंगभेद मोठया प्रमाणात होता. महिलांना त्या काळात शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. हे चित्र आज थोडे बदलले आहे. मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठविले जात आहे. मात्र जास्तकरून दहावीपर्यंतच. त्यानंतर पुन्हा त्यांना लग्नाच्या बेडीत अडकवून घर आणि मूल यातच ठेवले जाते. काही मुलीच या उच्च शिक्षण घेऊन नोकरी करीत आहेत.
दुसरा एक सकारात्मक बदल जाणवला तो म्हणजे, मुलगाच हवा, हा हट्ट आता कमी होत चालला आहे. मात्र पूर्ण संपलेला नाही. साधारणत: २ मुलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली जात आहे. मात्र कुटुंब नियोजनाचा हा भार आजही महिलांवरच टाकला जात आहे. हे सर्व असले तरी महिला आणि पुरूष यांच्यातील भेद मात्र आजही तसाच आहे तो तिळमात्र कमी झालेला नाही. (प्रतिनिधी) ■ मुलाचा हट्ट झाला कमी
■ ग्रामीण भागात आजही मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी
■ मुलींना नोकरीस पाठविण्यास कुटुंब होत नाही राजी
■ कुटुंब नियोजनाचा भार आजही महिलांवरच
■ महिलांचे आर्थिक सक्षमीकरणाचे प्रमाण कमी डॉ. कॅरोल वॉलसोफ यांनी नोंदविलेली निरीक्षणे.. ■ गेल्या ४४ वर्षापासून महाराष्ट्रात राहणार्या डॉ. कॅरोल वॉलसोफ या मराठमोळया संस्कृतीशी एकरूप झाल्या आहेत. गावात अभ्यास करताना स्थानिक भाषा यावी म्हणून त्या मराठी भाषा शिकल्या. एवढेच नव्हे तर भारतीय पोशाख परिधान करून हातावरच्या भाकर्याही त्या थापतात. आता त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचाच एक भाग झाल्याचे स्वत: सांगतात.